सारंग चाफ़ले |
- अपंगत्वावर मात करणा-या सारंगच्या जिद्दीला सलाम
- दिव्यांग क्रिकेट विश्वात भारताकडून म्हणून भरीव कामगिरी
- जनमत: पोलीओमुळं एक पाय अधु
- क्रिकेटसोबतच शैक्षणिकदृष्ट्याही स्वालंबी
- अष्टपैलू म्हणून आंतरराष्ट्रीय लौकीक
- महावितरण मध्ये यंत्रचालक म्हणून कार्यरत
नागपूर- हात-पाय धडधाकट असूनही अनेकांना मेहनतीचा कंटाळा असतो. तर दुसरीकडे अपंग असूनही मनाने अभंग असलेल्या काही व्यक्ती प्रयत्नांच्या जोरावर यशस्वी होतात. जन्मत:च पोलीओमुळे एक पाय अधु असतांनाही नागपुरात राहणा-या सारंग चाफ़ले याने त्याच्या अपंगत्वावर मात करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे.
भारतामध्ये क्रिकेट हा केवळ एक खेळ नव्हे तर तो एक धर्म आहे, खरेतर या खेळाची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की खेळाच्या मैदानावर केवळ 22 खेळाडूंमधील हा खेळ नसतो तर तो एका उत्कट भावनेचा उद्रेक असतो. तसेही भारतात दिव्यांग व्यक्तिला जीवन जगणे सहज शक्य नसतांना काही दिव्यांग क्रिकेटपटू आहेत, जे क्रिकेटमध्ये आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत आपले जीवन बदलण्याची इच्छाशक्ती ठेवतात, त्याचपैकी एक म्हणजे सारंग चाफ़ले. सारंगने आत्मविश्वासाला मेहनतीची जोड देऊन क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकारलं. पोलीओमुळे एक पाय अधू असतांनाही सर्व अडथळ्यांवर मात करुन सारंगने गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण असे क्रिकेटचे सर्व पैलू आत्मसात केले. विशेष म्हणजे आता तो पॅरा क्रिकेट टीम मध्ये राज्याचेच नव्हे तर देशाचंही प्रतिनिधित्वही करत आहे.
लहानपणापासूनच सारंगची क्रिकेटपटू होण्याची इच्छा होती. मात्र शारीरीक अपंगत्वामुळे त्याला अनेक मर्यादा होत्या. एकप्रकारे त्याच्या स्वप्नांना ग्रहण लागलं. मात्र हताश न होता त्याने संकटांशी सामना करण्याचं ठरवलं. सारंगच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाचे स्वप्न प्रत्यक्षात आणायसाठी जीवाचं रान केलं, सारंगचे मित्र आणि प्रामुख्याने त्याचे प्रशिक्षक उत्तम मिश्रा यांनीही सारंगला सदैव प्रोत्साहीत केले. क्रिकेट खेळता- खेळता सारंगने दहावी-बारावी व त्यानंतर आयटीआय, ग्रॅज्युएशन असे टप्पे पार करत शैक्षणिकदृष्ट्याही स्वावलंबी होण्याचं ठरवलं. त्याची ही जिद्द अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. आज सारंग अभियांत्रीकी पदविकाही पुर्ण करण्याच्या मार्गावर आहे. सारंगच्या मते “आमचे खेळायचे तंत्र थोडे वेगळे आहे मात्र, आम्ही आशेवर नव्हे तर आपल्या जिद्दीने खेळतो. जो पडायला घाबरतो, तो कधीही आकाशी झेप घेऊ शकत नाही”.
महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या बुटीबोरी विभागातील 33/11 केव्ही इसासनी उपकेंद्रात यंत्रचालक म्हणुन कार्यरत सारंगने डवखुरी गोलंदाजी आणि फ़लंदाजी करीत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात अष्टपैलू म्हणुन स्थान मिळविले आणि आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर हे स्थान बळकट केले, एवढेच नव्हे तर त्याच्या खेळातील सातत्य आणि आक्रमकता बघता सलामी फ़लंदाज म्हणून संघाने त्याचेवर महत्वपुर्ण जवाबदारी टाकली, ही जवाबदारीही त्याने यशस्वीरित्या पार पाडीत त्याचेवर टाकलेला विश्वास त्याने सार्थकी ठरविला. आपल्या क्रिकेट प्रवासात महावितरणमधील अधिकारी आणि सहका-यांची मदत, त्यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन आपल्याला सदैव मार्गदर्शकाचे काम करीत असल्याचेही त्याने सांगितले.
बंगलेरू येथे नुकत्याच झालेल्या 7 व्या राष्ट्रीय सुपर अप्लेड चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकाविले, या स्पर्धेत देशभरातील सहा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतेही सारंगने अष्टपैलू खेळ करीत महाराष्ट्राच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली, यापुर्वीही मागिल वर्षी उत्तरप्रदेशातील नोएडा येथे अफ़गाणिस्तान सोबत झालेल्या दिव्यांगाच्या टी-20 ‘दोस्ती कप’ स्पर्धेत सारंगने सारंगची सर्वोत्कृष्ट फ़लंदाज म्हणुन निवड करण्यात आली, ही मालीका भारताने 2-1 ने जिंकून मालीकाविजयावर शिक्कामोर्तब केले, या स्पर्धेत सारंगने दोन सामन्यात एका अर्धशतकासह एकून 100 धावा पटकाविल्या होत्या. यापुर्वी 2014 साली दक्षिण आफ़्रीकेतील जोहानन्सबर्ग येथे झालेल्या मालिकेत भारतीय संघाने दक्षिण आफ़्रीका संघावर 6-0 असा दणदणीत विजय मिळविला होता, या मालीकेतही सारंगने सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकाविला होता. तर जून 2012 मध्ये पाकीस्तान येथे झालेल्या ‘अमन की आशा’ या दोन सामन्याच्या टी-20 मालीका विजयातही सारंगने महत्वपुर्ण भुमिका पार पाडली होती. याचसोबत सारंगने अनेक स्पर्धातून भारताचे प्रतिनिधित्व केले असून सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे त्याला सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत आहे.