Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १६, २०१८

कुक्कुटपालनास ५० टक्के शासन निधी मिळणार

 गुहागर - ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय

मिळावा म्हणून राज्य सरकारने सधन कुक्कुट विकास गट (पोल्ट्री फॉम) प्रत्येक तालुक्‍यात निर्माण करण्याची योजना बनविली आहे. कुक्कुटपालन आणि अंडी उबवणूक केंद्र यासाठी १० लाख २७ हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक आहे. त्यापैकी ५० टक्के रक्कम (५ लाख १३ हजार ७५०) शासनातर्फे देण्यात येणार आहे. 

प्रत्येक तालुक्‍यात एक कुक्कुट पालन केंद्र (पोल्ट्री) व अंडी उबवणूक केंद्र (हॅचरी) तयार झाल्यास तालुक्‍यातच पक्षी (चिकन) आणि अंडी उपलब्ध होतील. परजिल्ह्यातून येणारे पक्षी आणि अंड्यावर येथील व्यावसायिकांना अवलंबून राहावे लागणार नाही. आज ग्रामीण भागातील जवळपास सर्व बाजारपेठांतून चिकन मार्ट आणि अंड्यांची विक्री होते. तालुक्‍यात कुक्कुट पालक केंद्र सुरू झाल्यास बेरोजगारांना मार्केट उपलब्ध असलेला व्यवसाय मिळेल. या उद्देशाने शासनाने सार्वजनिक, खासगी, भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट ही योजना तयार केली आहे. 

या योजनेअंतर्गत १००० चौरस फूटाच्या दोन शेड व ५०० चौरस फुटाची खाद्यशेड बांधता येईल अशी जागा, स्वतंत्र वीज आणि मुबलक पाण्याची सोय असणे आवश्‍यक आहे. अंडी उबवणूक केंद्रासाठी १००० अंडी उबवणुकीची क्षमता असलेले यंत्र घेणे आवश्‍यक आहे. या यंत्राला विनाखंडीत वीजपुरवठा होण्यासाठी १४ के. व्ही. ए. क्षमतेचा जनरेटर स्वखर्चाने विकत घ्यावयाचा आहे. या सुविधा असणारे ग्रामस्थ शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेसाठी आवश्‍यक असणारे स्वतः:च्या हिस्साचे भांडवल लाभार्थी कर्ज घेऊनही उभे करू शकतो. लाभार्थीला सदरचा व्यवसाय किमान ३ वर्ष करणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८ या कालावधीत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

निवड झालेल्या लाभार्थ्याला पशुसंवर्धन विभागातर्फे शेड बांधणे, अंडी उबवणूक केंद्र चालविणे, पक्षांची जोपासना, त्यांना द्यायचे खाद्य व औषधे, रोगप्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजना, व्यवसाय कसा करावा आदी सर्व प्रकारचे प्रशिक्षण त्याच्या व्यवसायाचे ठिकाणी मोफत देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतरही तीन वर्ष लाभार्थ्याला आवश्‍यक असणारे सर्व मार्गदर्शन पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणार आहे. 

साधारणपणे एका कुक्कुटपालन केंद्रात २००० पक्षी, सुमारे ८०० ते १४०० अंड्यांची निर्मिती होईल. पक्षी, पिले व अंडी यांची विक्री लाभार्थ्यांना करता येईल. सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी (गट - अ) व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांची कमिटी लाभार्थ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, तंत्रज्ञान पुरवणार आहे. - डॉ. प्रदीप झणकर, उपायुक्त, पशुसंवर्धन, जि. रत्नागिरी

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.