Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर २८, २०११

आता कचऱ्यापासून वसतिगृहात लखलखाट



चंद्रपूर - महाविद्यालयातील वसतिगृहातून निघणारा कचरा एरवी रस्त्यावर फेकून दिला जायचा. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा मोठाच प्रश्‍न होता; मात्र प्राचार्यांच्या सुपीक डोक्‍यात एक कल्पना आली आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिला प्रयोग साकार झाला. विद्यार्थ्यांनीच फेकलेल्या कचऱ्यातून त्यांच्याच वसतिगृहातील खोल्यांमध्ये आता लखलखाट होत आहे.
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हा प्रयोग साकार झाला आहे. "बायोमॉस टू इलेक्‍ट्रिसिटी' हा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प तीन वर्षांआधी या महाविद्यालयात सुरू करण्यात आला. पूर्ण क्षमतेने तो सुरू आहे. 15 किलोवॉट वीजनिर्मिती सध्या होत आहे. या विजेचा उपयोग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी होत आहे. यासाठी वसतिगृहातील केरकचरा आणि शौचालयातील मलमूत्राचा वापर केला जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शंभर किलोवॉटचा प्रकल्प येथे लावण्यात आला आहे. यासाठी 121.5 टन कचऱ्याची रोज आवश्‍यकता आहे. याला चंद्रपूर नगरपालिका पूर्ण सहकार्य करीत आहे. रोज न चुकता शहरातील गोळा केलेला कचरा महाविद्यालयात आणून टाकला जात आहे. या कचऱ्यातून "वेस्ट' वेगळे करण्यासाठी मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. हा 25 लाख रुपयांचा प्रकल्प आहे. डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू आहे. यावर स्वत: महाविद्यालयाचे प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षित लक्ष ठेवून आहेत. अशाप्रकारचा प्रकल्प सुरू करणारे विदर्भातील हे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला महिन्याकाठी तीन लाख रुपये वीजबिल येते. आता हा आकडा कमी होईल, असे दीक्षित यांनी सांगितले. यासोबतच एकट्या वसतिगृहाचे वीजबिल 15 हजार रुपयांच्या घरात होते. आता ते शून्यावर आले आहे. विशेष असे की, काही वर्षांपासून या महाविद्यालयात अक्षय ऊर्जा पार्क सुरू करण्यात आला होता. येत्या काही दिवसांत येथे सहा किलोवॉटचा सोलर प्रोजेक्‍ट उभा केला जाणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.