Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर १३, २०११

शासकीय दुग्ध योजनेला परभणीच्या टॅंकरचा टेकू

श्रीकांत पेशट्टीवार
चंद्रपूर - राज्यात दूधसंकलन कमी झाले आहे. त्यातच दुग्ध सहकारी सोसायट्यांनीही पाठ फिरवल्याने शासकीय दुग्ध योजना अडचणीत आली आहे. सध्या परभणी येथून येणाऱ्या दुधावरच काम चालविले जात आहे. तेथील टॅंकर आल्यानंतरच चंद्रपूरकरांची दुधाची तहान भागते.
शहरातील शासकीय दूध डेअरीमार्फत दररोज 15 हजार लिटर दुधाचा पुरवठा केला जात आहे. यातील दहा हजार लिटर दूध एकट्या परभणीतून मिळते. उर्वरित पाच हजार लिटर दूध गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा, नागभीड येथील काही दुग्ध सहकारी संस्थांमार्फत मिळत आहे. गेल्या काही वर्षांत दूधसंकलन कमी झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यास पाहिजे तसा दुधाचा पुरवठा होत नसल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. 17 ते 18 हजारांहून अधिक लिटरची जिल्ह्यात दुधाची आवश्‍यकता दररोज असते; परंतु हा पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी बऱ्याच जणांना दूध मिळत नाही.

शहरात शासकीय दूध डेअरीचे 60 वितरक आहेत. या वितरकांना स्टेजनुसार कमिशन दिले जाते. त्यांच्याकडून दररोज वाढीव मागणी केली जात आहे; मात्र कमी दुधामुळे त्यांनाही कमीच दूध देण्यात येत आहे. खासगी दूध कंपन्या जास्त भाव देतात. त्यामुळे दुग्ध उत्पादक संस्था त्यांनाच दूध देतात. खासगी दूध कंपन्या वितरकांनाही जास्त कमिशन देतात. त्यामुळे हे वितरक शासकीय दुधासोबतच खासगी दुधाची मोठ्या प्रमाणावर विक्री करीत आहेत. जिल्ह्यात दोनशेच्या घरात दुग्ध सहकारी संस्था आहेत; मात्र यातील अर्ध्याअधिक बंद आहेत. सद्य:स्थितीत नागभीड येथील दहा आणि चंद्रपूर तालुक्‍यातील सहा दुग्ध सहकारी संस्था सुरू आहेत; मात्र या दुग्ध सहकारी सोसायट्यांकडून पाहिजे तसे दूध मिळत नाही. पाच वर्षांपूर्वी येथे 30-32 हजार लिटर दुधाची निर्मिती केली जात होती. आता मात्र 15 हजार लिटरची निर्मिती केली जात आहे. पूर्वी जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत दुधाचा पुरवठा केला जात होता. आता मात्र राजुरा आणि बल्लारपूर तालुक्‍यातच दुधाचा पुरवठा केला जात आहे. एकूणच शासकीय दुग्ध योजनेतून दूध कमी मिळत असल्याने खासगी दूध विक्रेत्यांची चांदी होत आहे.

कनेरीचे शीतसंकलन केंद्र कुलूपबंद
गडचिरोली जिल्ह्यातील कनेरी येथे दुग्ध शीतकरण केंद्र आहे; मात्र ते वर्षभरापासून बंद आहे. दुधाचा पुरवठा कमी आणि वाहतूक खर्च जास्त असल्यानेच हे संकलन केंद्र बंद करण्यात आले. आता फक्त चार चौकीदार या केंद्राची राखण करीत आहेत. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.